पडोली भाजीबाजारात कचऱ्याचा ढिग
चंद्रपूर: येथून जवळच असलेल्या पडोली येथील बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खेरदी करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे नागिरकांची भीती अधिकच वाढली आहे.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
कोरपना : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा
चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत त्यांना नोकरी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विविध कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वेकोलि, सिमेंट कंपन्या तसेच वीज मंडळामध्येही मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.
कापूस उत्पादकांची चिंता वाढली
चंद्रपूर : यावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. परतीच्या पावसामुळे सर्व काही नेले आहे. त्यातच बोंड अळीनेही डोके वर काढले आहे. भाव कमी असतानाच वेचनीसाठी मजुरांची कमतरता असल्यामुळे नाईलाजास्तव ७ ते ८ रुपये दराने वेचनी करावी लागत आहे. निसर्गाची अवकृपा झाली, पावसाने साथ दिली नाही. झाडांना बोंडाची लागण नाही. उच्च प्रतीचे बियाणे व फवारणी औषधीचा वापर करून सुद्धा उत्पादनाची जैसे थे स्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.मजुरांची कमतरता असल्यामुळे वेचनी झाली नाही.
भद्रावती, राजूरा येथे ऐतिहासिक संग्रहालय उभारा
राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावती नगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होईल. त्या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल. पुरातत्व विभागाने लक्ष देऊन संग्रहालय उभारावे अशी अपेक्षा इतिहासप्रेमीकडून व्यक्त होत आहे.
पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करा
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपणा, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, घुघुस, कोठारी, विसापूर, भिसी, तळोधी बाळापुर येथे एकही विद्या शाखेचे पदव्युत्तर महाविद्यालय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यावे लागते. याठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेचे पदव्युत्तर महाविद्यालय सुरू केल्यास शिक्षणाची गैरसोय होईल. यादृष्टीने गोंडवाना विद्यापीठांने येथे अनुदानित महाविद्यालयाला मंजुरी प्रदान करावी. अशी गरज व्यक्त होत आहे.
राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना करा
जिवती : आदिवासी बहुल, अतिदुर्गम, अविकसीत तालुका म्हणून जिवती व कोरपना तालुक्याची सर्वदूर ओळख आहे. या तालुकास्तरावर एकही राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने येथील नागरिकांना इतरत्र जाऊन आपली कामे करावी लागते आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून या तालुकास्तरावर राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्यात यावी. जेणेकरून नागरिकांची होणारी अडचण दूर होईल.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
चंद्रपूर : जिल्हाभरातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही.
प्रशासकाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ
चंद्रपूर : जिल्ह्यातील ५८० ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यात आले आहे. मात्र एका प्रशासकावर तीन ते चार ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातच त्यांच्या विभागाचा कार्यभारही आहे. त्यामुळे प्रभासक गावाकडे फिरकत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. परिणामी गावाच्या विकासावर परिणाम पडला आहे.
.