बाबूपेठ पुलाचे काम गतीने करावे
चंद्रपूर : येथील बाबूपेठ रेल्वे पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम त्वरित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
खड्ड्यांमुळे वाढले विविध आजार
जिवती : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. यातच विविध आजार वाढले आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचून राहत असल्यामुळे त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
चंद्रपूर : काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणात शहरात प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
वाहनधारकांवर कारवाईची मागणी
चंद्रपूर : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये ,तसेच सार्वजनिक शौचालय आहेत. मात्र, अनेकजण या शौचालयाचा वापर न करता बाहेर जातात. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.
घंटागाडी नियमित पाठविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगरसह अन्य काही वार्डांत घंटागाडी अनियमित येत असल्याने नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडचण जात आहे. त्यामुळे या परिसरात दररोज घंटागाडी पाठवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, विद्युत पुरवठा नियमित करावा, अशी मागणी होत आहे.
बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून, शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे, तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागतात. मात्र, बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. बल्लारपूर-सिंरोचा रेल्वे मार्ग तयार झाल्यास नागरिकांना सोईचे होणार आहे.