विद्युत, पाणीपुरवठा आठवडाभर बंद : वेकोलि प्रशासनाचा बेजबाबदारपणा
विनायक येसेकर
भद्रावती : मागील आठवड्यात माजरी एरियातील कोळसा खाणीसह एकतानगर वसाहतीतील तब्बल आठवडाभरासाठी विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे येथील पाणीपुरवठा सुद्धा बंद होता. या परिस्थितीचा नाहक त्रास सहन केल्यानंतर आता एकता नगर वसाहत पावसामुळे जलमय होत असल्याने वसाहतवासीयांची चिंता वाढली आहे.
माजरी एरियातील चारगाव, तेलवासा, ढोरवासा या खाणी बंद असल्याने येथील खाणीचे कामगार आता एकतानगर वसाहतीत राहतात. हे कामगार एरियातील इतर खाणीमध्ये कार्य करीत असून कोळशाच्या उत्खननाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कामगार मेहनत करीत असतात. त्याच कामगार व त्यांच्या परिवाराकडे वेकोलि प्रशासनाने आता पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. मागील आठवड्यात वेकोलिच्या विद्युत विभागात तांत्रिक बिघाड झाल्याने माजरी सह एकतानगर वसाहत सुद्धा अंधारात राहिली. ज्या कामगार वर्गाचे भद्रावती परिसरात घर होते, ते तिथे राहण्यास गेले तर काही कामगार लाॅजिंग करून राहिले तर काहींना तर वसाहतीत राहणे भाग पडले. त्यामुळे तब्बल आठवडाभर दिवस -रात्र जागते रहो असा नित्यनेम चालू होता. त्यातच पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागली. या आठवडाभरात या कामगारांच्या कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागला. वेकोलि प्रशासनाकडून गेल्या कित्येक वर्षांपासून नाल्याची सफाई केली नाही. झुडपी झाडाची कटाई नाही. त्यामुळे थोडाफार पाऊस आला तर वसाहत संपूर्ण जलमय होत असते.
बॉक्स
डासांचा प्रादुर्भाव वाढला
गटाराचे पाणी सर्वत्र साचल्याने डासांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कामगारांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या कामगार संघटनांनी मात्र चुप्पी साधली आहे. हा संपूर्ण प्रकार बघता वेकोलि प्रशासनाने वसाहतीकडे दुर्लक्ष केले आहे. वेकोलि प्रशासनाला कामगारांच्या हिताची केव्हा जाणीव होणार, याकडे आता कामगारांचे लक्ष लागले आहे.
290721\img_20210728_122829.jpg
विद्युत , पाणीपुरवठा ने त्रस्त झालेली वेकोली वसाहत आता जलमय .