सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत पोवनी २ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त तरुणी आशा घटे आत्महत्या प्रकरणातील आरोपी वेकोलिचे नियोजन अधिकारी जी. पुलय्या यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व अर्जासाठी न्यायालयात मंगळवारी सुनावणी होती. या प्रकरणाचे तपास अधिकारी यांनी प्रकरणाचे केस पेपर न्यायालयात आज दाखल केले. न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख दिली असून या प्रकरणाची सुणावणी आता २२ एप्रिल रोजी होणार आहे.
आशा तुळशीराम घटे आत्महत्या प्रकरणी पुलय्या यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भांदवि ३०६ कलमान्वये ४ एप्रिलला गुन्हा दाखल झाला होता. २० दिवस लोटूनही पुलय्या पोलिसांच्या हाती लागले नसले तरी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ६ एप्रिल रोजी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने रिप्लायसाठी १२ एप्रिल, त्यानंतर १५ एप्रिल, त्यानंतर २० एप्रिल ही तारीख दिलेली होती. प्रकरणाचे तपास अधिकारी एपीआय दरेकर यांनी मंगळवारी केस पेपर न्यायालयात सादर केले असून न्यायालयाने सुनावणीसाठी २२ एप्रिल ही तारीख दिलेली आहे. त्यात पुलय्या यांचा अटकपूर्व जामीण अर्ज मंजूर केला जातो की फेटाळला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
न्यायासाठी झटणारे संजय घटे यांचा कोरोनाने मृत्यू
या प्रकरणात आशाला न्याय मिळावा म्हणून तिचे मोठे वडील संजय घटे हे मागील अनेक दिवसांपासून झटत होते. पोलीस, वेकोलि प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कामगार संघटना यांच्याकडे जाऊन ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. अशातच त्यांना कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात बेड न मिळाल्याने त्यांना तेलंगणातील मंचेरियाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने घटे कुटुंबीयांवर पुन्हा मोठे आभाळ कोसळले आहे.