गोवरी : राजुरा तालुक्यात २२ व २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या पावसामुळे गोवरी परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा खासदार बाळू धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत शनिवारी घेण्यात आला. वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या चुकीच्या नियोजनामुळे गोवरी आणि परिसरातील गोरगरीब जनतेचे फार मोठे नुकसान झाले. यामध्ये १७२ घरे पाण्याखाली आली आणि अनेक लघु उद्योगाला फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, लघुउद्योग, आणि घरांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात याव्यात तसेच या पुढे मातीच्या ढिगाऱ्यांचे योग्य नियोजन वेकोलिने करावे, अशा सूचना वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी गावकऱ्यांना त्यांनी आश्वस्त केले की सर्व पूरग्रस्तांना वेकोलि योग्य ती मदत आणि पूरग्रस्त शेतीचे भूसंपादन करणार आहे. आमदार सुभाष धोटे यांनीही वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा सोडून अशा प्रकारचे नुकसान यापुढे होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, उमाकांत धांडे, रंजन लांडे, सरपंच आशा उरकुडे, उपसरपंच उमेश मिलमिले, नंदु वाढई, हरिचंद्र जूनघरे, बबन उरकुडे, चेतन बोभाटे, शिवराम लांडे, बबन लांडे, देवीदास ठेंगणे, आकाश नांदेकर उपस्थित होते. प्रास्ताविक उमाकांत धांडे यांनी तर संचालन प्रकाश काळे यांनी केले.
220821\img_20210821_181054.jpg
गोवरी पूरग्रस्तांना वेकोली मदत आणि पूरग्रस्त शेतीचे अधिग्रहण करणार -- खासदार बाळुभाऊ धानोरकर