भद्रावती(चंद्रपूर) : वेकोलीच्या इतिहासातील सर्वांत मोठी खुली कोळसा खाण भद्रावती तालुक्यातील कोंढा व हरदाळा रिठ परिसरात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या अनुषंगाने संबंधित गावांमध्ये ग्रामस्थ व शेतकऱ्यांची चाचपणी वेकोलीद्वारे सुरू झाली आहे.
याबाबत कोंढा येथील रेणुका माता मंदिरात ग्रामस्थ व कास्तकारांची वेकोलीमार्फत बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये वेकोलीचे तीन अधिकारी उपस्थित होते. चालबर्डी या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोंढा येथील बैठकीत गुणवंत मत्ते, सरपंच महेश मोरे, संतोष देरकर, विजय मत्ते, वामन मते,रामदास वैद्य, अशोक मते, शिवाजी मते, भाऊराव मते, प्रवीण आगलावे व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
जमीन अधिग्रहण करण्याच्या दृष्टीने शेतजमिनीच्या व्हॅल्युएशनपेक्षा चारपट किंमत वेकोली शेतमालकांना देण्यास तयार आहे. परंतु, या मोबदल्यात वेकोलीमध्ये कुठल्याही प्रकारे नोकरी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार नाही. त्याऐवजी संबंधित शेतमालकाला पेन्शन म्हणून तीस हजार रुपये महिना तीस वर्षांपर्यंत देण्यात येणार असल्याचे यावेळी वेकोली अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. दोन एकरवर मालकी असलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून, या परिसरातील जवळपास ३२५ हेक्टर जमीन कोळसा खाणीसाठी लागणार असल्याची माहिती बैठकीत ग्रामस्थांना दिली.
२५ हेक्टरमध्ये कोळसा खाण प्रस्तावित
या जमिनीत चांगल्या प्रतीचा कोळसा आहे. पण, जास्त खोलात आहे. तसेच ओव्हरबर्डनसाठी वेकोलीद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
२५ हेक्टरमध्ये ही कोळसा खाण होऊ घातली असून, ८ मिलियन टन पर वार्षिक उत्पादन राहू शकते, अशी माहिती आहे.
सात गावांची जमीन खाणीत जाणार
कोंढा, चालबर्डी, कढोली नंदुरी, टाकळी, किलोनी, पळसगाव, विस्लोन या भद्रावती तालुक्यातील गावांची शेतजमीन या खाणीत जाण्याची शक्यता आहे.
कागदोपत्री अजून कोणतीही कारवाई झाली नसली तरी नोकरीबाबतची शेतकऱ्यांची मानसिकता काय आहे, याबाबत वेकोली अधिकाऱ्यांमार्फत चाचपणी सुरू झाली आहे. खाण सुरू करण्याचा ॲक्शन प्लान वेकोलीद्वारे पूर्ण होत आला आहे. नोकरी मिळत असेल तरच आम्ही शेतजमीन हस्तांतरित करू यावर या परिसरातील शेतकरी ठाम असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले.
कोळसा खाणीवर आधारित उद्योगांनाही चालना मिळणार
परिसरात खदान सुरू होणार हे कळताच त्या क्षेत्रातील जमिनी खरेदी करण्यासाठी चढाओढ लागली आहे. जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. खाण सुरू झाल्यास भद्रावती तालुक्याच्या विकासात मोठा हातभार लागणार आहे. कोळसा खाणीवर आधारित उद्योगांमध्ये वाढ होणार आहे. पण, वेकोलीच्या नोकरी न देण्याच्या धोरणामुळे बेरोजगारांचा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहणार आहे.
या परिसरात असलेली टॉवरची अडचण, अन्य तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामस्थांच्या नोकरीबाबत मागण्या मान्य झाल्यास लवकरच ही खाण सुरू होऊ शकते.