मतपरिवर्तनाचीही लगबग : छाननीनंतर उमेदवारांच्या गाठीभेटी सुरूचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १८ फेब्रुवारीला होत आहे. याला आता केवळ १४ दिवस शिल्लक आहेत. म्हणजेच प्रचारासाठी केवळ बाराच दिवस उरले असल्याने उमेदवारांची धावपळ वाढली आहे. छाननीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एक हजार २७ उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व उमेदवार आता आपल्या मतदार क्षेत्रात मतदारांच्या भेटीगाठी घेत असून रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे.यावेळी उमेदवारांकडे प्रचारासाठी फारच कमी कालावधी असल्याने उमेदवार आपल्या समर्थकांच्या माध्यमातूनही प्रचार करीत आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत उमेदवार स्वत: जाऊ शकत नसल्याने आपल्या समर्थकांना मतदारांपर्यंत पाठवून त्यांचे मतपरिवर्तन केले जात आहे. दरम्यान, गुरूवारी झालेल्या छानणीनंतर आता रिंगणात एक हजार २७ उमेदवार उरले आहेत. यात पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६२० तर, जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी भरलेले २३ नामांकन अपात्र ठरले आहे. यासोबतच पंचायत समितीसाठी भरलेले ५८ नामांकन छानणीत रद्द झाले. अनेक उमेदवारांनी दक्षता घेवून दोन नामांकन भरले होते. आज छानणीदरम्यान ते गळाले. असे असले तरी काही ठिकाणी धोका झालाच. जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची तारीख ५ फेब्रुवारी असून नामनिर्देशपत्र परत घेण्याचा अखेरचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. त्यानंतरच रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी ज्यांचे रिंगणात स्थान निश्चित आहे, त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. काही उमेदवारांनी तर मतदारांना आतापासूनच पार्ट्या देणे सुरू केले आहे. तर काही उमेदवार मतदारांना विविध विकासकामांचे प्रलोभन देत असल्याचेही मतदार क्षेत्रात दिसून येत आहे. ग्रामीण भागातील पानटपरी, चहाटपरी व चौकाचौकात निवडणुकीच्याच गोष्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान पदाधिकारी आपण केलेल्या कामांची आठवण मतदारांना करून देण्यात गुंतले आहे. (शहर प्रतिनिधी)निवडणूक निरीक्षक नियुक्तचंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या संबंधी नागरिकांना व मतदारांना काही तक्रार, निवेदन अथवा अडचण असल्यास निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अर्जुन चिखले यांनी केले आहे. सावली, मूल व चंद्रपूर तालुक्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांची तर वरोरा, भद्रावती, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्याकरिता निवडणूक निरीक्षक म्हणून नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त करमणूक शुल्क पराग सोमण हे तर नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून गोंदिया येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची तर राजुरा, गोंडपिपरी, जिवती व कोरपना तालुक्याकरिता निवडणूक निरीक्षक म्हणून गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंबंधातील काही तक्रारी असल्यास निवडणूक निरीक्षक तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे करता येतील, अशी माहिती चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी म्हटले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीला आलाय वेग
By admin | Published: February 05, 2017 12:30 AM