वृक्षारोपण मोहिमेला वेग : पालकमंत्र्यांच्या हस्ते आज मुख्य कार्यक्रम, जिल्ह्यात २८ लाखांवर वृक्ष लागवडीचा अंदाजलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर्षी चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या योजनेच्या पहिल्याच दिवशी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. पहिल्या दिवसाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात पोंभुर्णा तालुक्यात घनोटी या गावात पार पडला. वनविभागाने चार लाखांवर वृक्ष लावले आहे. तर जिल्हाभरात शासकीय कार्यालय, शाळा, ग्राम पंचायती व विविध संस्थांमध्ये पहिल्याच दिवशी लक्षावधी वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. ही आकडेवारी जवळपास पाच लाखांवर असून याच गतीने पुढील सात दिवस वृक्षलागवडीला प्रतिसाद मिळाल्यास जिल्हयात यावर्षी विक्रमी वृक्षलागवडीचे संकेत आहेत. १ ते ७ जुलै या काळामध्ये राज्य शासनाच्या वनविभागाने चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २८ लाखांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम २ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता प्रस्तावित मेडीकल कॉलेजजवळ गट क्रमांक ५०३ मध्ये होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी वृक्षलागवड करणार आहेत. मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हयातील विविध ठिकाणी वनविभागाने मोठया प्रमाणात वृक्षलागवड सुरू केली आहे. वनविभागाने पहिल्याच दिवशी तीन लाख २८ वृक्ष लागवड केली आहे. वृक्षलागवडीच्या नियोजित ६३ जागांपैकी पहिल्या दिवशी १५ ते २० जागांवर वृक्षलागवड झाली असून अन्य ठिकाणी पुढील सात दिवसात युध्द पातळीवर हे काम चालणार आहे. वनविकास विभागानेही आपल्या उद्दिष्टाकडे दमदार आगेकुच सुरु केली असून आज पहिल्याच दिवशी ४६ हजार ६०० वृक्षलागवड केली आहे. विविध विभागांकडून वृक्ष लागवडजिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातील शासकीय कार्यालयामध्ये शनिवारी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयात मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वृक्षलागवडीमध्ये सहभाग घेतला. जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी व कर्मचाऱ्यांनी वृक्षलागवड केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांच्या नेतृत्वात कर्मचारी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. मनपाकडून रोपांचे वितरणमहापौर अंजली घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या नेतृत्वात वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून घरापर्यंत लोकांना रोपे देण्यापासून प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यातही आघाडी घेतली आहे. त्यांनी घरोघरी पोहचविलेल्या वृक्षांची आज शनिवारी मोठया प्रमाणात शहराच्या विविध भागात नागरिकांनी लागवड केली. आज पहिल्याच दिवशी झोन क्रमांक एक मध्ये तीन हजार ६५०, झोन क्रमांक दोनमध्य २ हजार ४३३, झोन क्रमांक तीनमध्ये तीन हजार २७० वृक्षांची लागवड केली आहे. याशिवाय शहरातील ७४० नागरिकांना वृक्षाच्या संगोपनाच्या हमीसह रोपांचे वाटप करण्यात आले आहे. आज एकूण दहा हजार ९३ वृक्ष लागवड महानगरपालिकेने केली आहे.
पहिल्याच दिवशी पाच लाखांवर वृक्षलागवड
By admin | Published: July 02, 2017 12:34 AM