बल्लारपूर: बल्लारपुरातील पशुवैद्यकीय रुग्णालय मागील अनेक वर्षांपासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच खेड्यांतील पशू या रुग्णालयात उपचारासाठी आणली जातात. परंतु जुन्या पद्धतीच्या इमारत व अध्याधुनिक उपचार पद्धतीच्या अभावामुळे येथे येणाऱ्या पशूंची गैरसोय होत आहे.
मागील दहा वर्षांत बल्लारपूर शहराचा कायापालट झाला. तालुक्यातील जनतेच्या सोईकरिता अनेक शासकीय इमारती नव्याने बांधण्यात आल्या. सामान्य रुग्णालय, अग्निशमन दलाची इमारत, तहसील कार्यालय, उपविभागीय इमारत, सब्जी मार्केटची इमारत, शासकीय विश्रामगृह यांची इमारत नव्याने बांधण्यात आली व वसंत वाचनालयाची इमारत व मटण मार्केट इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. परंतु पशुवैद्यकीय इमारतीबद्दल शासन एवढे उदासीन का, या जुन्या इमारतीचे बांधकाम बल्लारपूर तालुकानिर्मितीच्या अगोदर झाले आहे. आज बल्लारपूर तालुका होऊन २५ वर्षांच्या वर काळ लोटला असून, दरम्यान अनेक शासकीय इमारतींचा कायापालट झाला आहे; परंतु पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत मात्र आजही जीर्णोद्धारच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीचे नव्याने बांधकाम व अत्याधुनिक सेवांनी सज्ज व्हावे, अशी मागणी पशुपालक नागरिक करीत आहेत.