गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, आवळगाव, चौगाण, निलज, मेंडकी या सर्व गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवा डॉक्टरांच्या मुख्यालयी न राहण्यामुळे कोलमडली आहे. गांगलवाडी येथील पशु वैद्यकीय दवाखाना कधीच सुरूच दिसत नाही. त्यामुळे या दवाखान्यात डॉक्टर आहे की नाही, असाच प्रश्न सर्वांना पडतो. त्यामुळे येथील पशु पालकांना त्रास सहन करावा लागतो. परंतु वरिष्ठ अधिकारी मात्र लक्ष देत नसल्याची खंत या भागातील पशु पालकांना आहे.मुडझा येथील पशु वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर मुख्यालयी न राहता ४० ते ५० किलोमिटर अंतरावरून येणे-जाणे करतो. त्यामुळे संबंधित डॉक्टर वेळेवर दवाखान्यात पोहचत नाही. त्यामुळे या भागातील पशु पालकांनादेखील अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या डॉक्टरांच्या त्रासामुळे बऱ्याचशा पशु पालकांना आपली जनावरे खासगी डॉक्टरांकडे नेवून औषधोपचार करावा लागत आहे. मुडझा येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात ही गंभीर समस्या निर्माण झाली असताना असताना वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील पशुपालकांकडून केला जात आहे. या दवाखान्यात जनावरांना आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे परिसरातील पशु पालक त्रस्त झाले आहेत. आता या डॉक्टरांनी मुख्यालयी राहुन सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच चौगण, मेंडकी व निलज येथील पशु वैद्यकीय दवाखान्याची हिच अवस्था आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही सेवा सुरळीत करावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
ब्रह्मपुरी तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा कोलमडली
By admin | Published: October 20, 2014 11:10 PM