राजुरा : आदिवासी समाजबांधवांना शासनाने उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनीवर गैरआदिवासी डल्ला मारत आहे. या जमिनीवर वीटभट्टीची परवानगी काढून आदिवासी बांधवांची लुबाडणूक करीत असल्याचा संतापजनक प्रकार मागील अनेक वर्षांपासून चुनाळा, बामनवाडा, सातरी परिसरात सुरु आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील चुनाळा, बामनवाडा आणि सातरी परिसरात आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने जमिनी दिल्या आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत वीटभट्टीचालक त्यांची फसवणूक करीत आहेत. ज्यांच्या नावाने विटाभट्टीचे परवानगी मिळते, ते आदिवासी बांधव वीटभट्टी चालवित नसून गैरआदिवासींकडून ती चालविली जात आहे. सध्या एकाही विटाभट्टी चालकांनी शासनाच्या निकषाची पूर्तता केली नसून राजुरा तालुक्यात विटांचा दर प्रचंड वाढला आहे. यात ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. ज्या आदिवासी बांधवाची जमिन आहे त्या आदिवासी बांधवांवर अन्याय सुरु आहे. मागील दहा वर्षांमध्ये राजुरा, बामनवाडा, चुनाळा, विरुर स्टेशनसह अनेक गावांमध्ये हा प्रकार सुरु आहे. या प्रकाराची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी)
आदिवासींच्या जमिनीवर वीटभट्टीधारकांचा कब्जा
By admin | Published: July 17, 2014 12:01 AM