लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धोकादायक कोरोना व्हायरस कधी संपेल, याची खात्री नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह आढळले, तर चंद्रपुरातील एकाचा संसर्गाने बळी गेला. ॲक्टिव्ह रुग्णांचीही संख्या चारवरून १२ पर्यंत पोहोचल्याने जिल्हा प्रशासनही अलर्ट झालो आहे. कोविड प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र, अजूनही लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने पटवून दिले जात आहे. मात्र, कालावधी संपूनही अनेकांनी लस घेतली नाही. डिसेंबर २०२१ मध्ये कोविड रुग्णांची संख्या तीनपर्यंत खाली घसरली होती. आता वाढू लागली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही शुक्रवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. गत २४ तासात जिल्ह्यात चार नवीन बाधित आढळले, तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यभरातील स्थिती लक्षात घेता नागरिकांनी कदापि बेफिकीर राहू नये. ३१ डिसेंबर २०२१ पासून लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर
८७,३३६ व्यक्ती कोरोनामुक्त
- जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८८ हजार ८९३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ३३६ झाली आहे. सध्या १२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७ लाख ९९ हजार ७०९ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी ७ लाख ९ हजार ६५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५४४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.