लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील प्रसिद्ध महाकाली मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. युवा परिवर्तन संघर्ष समिती आणि बिरसा ब्रिगेडने मोर्चाचे नेतृत्व केले.महाकाली मंदिरावर एकाच कुटुंबाचा ताबा असून विश्वस्त मंडळ नाममात्र आहे. मंदिरात कोट्यवधी रुपयांची देणगी गोळा होते. पण, भाविकांसाठी मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे विश्वस्त मंडळ बरखास्त करून शासनाने मंदिर ताब्यात घ्यावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. भाविकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून केवळ स्वार्थ साधले जात आहे, असा आरोपही मोर्चेकऱ्यांनी केला. त्यामुळे शुक्रवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. महाकाली मंदिरातून निघालेल्या या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महाकाली मंदिरात भक्तनिवास, स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मंदिराला पर्यटनाचा दर्जा देवून जीर्णोद्धार करावा, देवकर, देवकरीण, पोतराज, देवदासी, बाजा, वाद्य यांना मंदिर परिसरात तख्त टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तळेगावची गुरू राजामाय, शेळगावची गुरू यमुनामाय यांच्या नावाने मंदिर परिसरात भक्त निवास बांधून द्यावे, यात्रा कालावधीत नांदेड ते चंद्रपूर रेल्वेसेवा सुरू करावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे सादर करण्यात आले. बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आलेले शेकडो भाविक सहभागी झाले होते. निवेदन देताना चंद्रमाय लक्ष्मण डोणगावकर, रवी मेश्राम, बालाजी गाडेकर, मारोती वाघमारे, राहूबाई डवलगरे आदी उपस्थित होते.
जिल्हा कचेरीवर भाविकांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:11 PM
येथील प्रसिद्ध महाकाली मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. युवा परिवर्तन संघर्ष समिती आणि बिरसा ब्रिगेडने मोर्चाचे नेतृत्व केले.
ठळक मुद्देमहाकाली मंदिर शासनाने ताब्यात घेण्याची मागणी