घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मावा-तुडतुडा रोगांच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी तालुक्यातील २६ हजार ६२७ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे ही मदत केव्हा मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.धान पीक अंतिम टप्प्यात आल्यानंतर पिकांवर मावा व तुडतुडा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रोगांच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांची तीन ते चारदा फवारणी केली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. उलट रोगाचा प्रकोप वाढतच गेला. बऱ्याच शेतकऱ्यांचे संपूर्ण धानपीक नष्ट झाले होते. धानाची कापणी, जमा करणी व मळणी केली तरी हातात काहीच येणार नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या धान पिकास आग लावली. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाज म्हणून हा मार्ग स्वीकारला होता. एकीकडे धान पिकाच्या उत्पादनासाठी लावलेला खर्च आणि दुसरीकडे औषधांवर झालेल्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडेच मोडून गेले. शेतकऱ्यांवर झालेल्या या आक्रमणाचा विषय माध्यामांनी उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. दरम्यान, आदेश निर्गमित करून सर्वेक्षण करण्याचे दिले होते. या आदेशानंतर महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामसेवकांच्या मदतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नागभीड तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार २८ हजार २१२ हेक्टर जमीन क्षतिग्रस्त आहे. यात २६ हजार ६२७ शेतकऱ्यांची संख्या आहे. सर्व लाभार्थ्यांना १७ कोटी २१ लाख रूपयांची आवश्यकता आहे. नुकसानीचे सर्वेक्षण होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे शासन ही मदत शेतकऱ्यांना केव्हा वाटप करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.मंडळनिहाय नुकसानीचे क्षेत्र व मदत निधीनागभीड मंडळात ६५१६.११ हेक्टर क्षेत्र क्षतीग्रस्त असून ५ हजार २११ शेतकरी आहेत. या मंडळासाठी ३ कोटी ८६ लाख रूपयांची आवश्यता आहे. मेंढा मंडळात ६१९२.५१ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ५३९२ शेतकरी आहेत. त्यासाठी ३.७६ कोटी रूपयांची गरज आहे. मिंडाळा मंडळात ७०२८.३५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. ६ हजार ७११ शेतकऱ्यांना ४ कोटी ३५ लाख रूपयांची गरज आहे. तळोधी मंडळात ८४७५.९८ हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त असून ९ हजार ३१३ शेतकºयांना ५ कोटी २४ लाख रूपयांचा द्यावा लागणार आहे.