नांदाफाटा : वेगळ्या विदर्भाची मागणी अत्यंत जुनी आहे. आता ही लढाई सर्वसामान्यांची झाली असून वेगळा विदर्भ हाच विदर्भाच्या विकासाचा पर्याय असल्याचे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथे आयोजित ‘वेगळा विदर्भ का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून शेतकरी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक राम नेवले, अॅड. नंदा पराते, अरुण केदार, किशोर पोतनवार, प्रभाकर दिवे, सरपंच पंचफुला वडस्कर, मंगेश वडस्कर, सचिन बोंडे, अॅड. राजेंद्र जेणेकर, समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, रवी गोखरे, कपिल इद्दे, नितीन भागवत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना खांदेवाले म्हणाले, विदर्भ भूमी ही संपन्न भूमी आहे. वन, खनिज, पाणी आणि शेतजमीन समृद्ध आहे. याचा उपयोग मात्र वैदर्भीय जनतेला न होता इतरांना अधिक होत आहे. यानंतर अॅड. चटप यांनी नागपूर करारानुसार एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के लोकसंख्येनुसार विदर्भातील प्रशासकीय सेवा, शासकीय सुविधा, योजना, कर्मचारी भरती, शिक्षण, आरोग्य आदी सेवा देणे बंधनकारक होते. मात्र असे घडले नाही. विदर्भात निर्माण होणारी वीज विदर्भातील जनतेला ७ ते ११ रुपये युनिटप्रमाणे घ्यावी लागते. तीच वीज मुंबई, पुणे, नाशिकवाल्यांना ५.५० रुपयात मिळते. त्यामुळे शेतकरी, सामान्य नागरिक आणि विदर्भातील कारखानदाराला अधिक पैसे मोजावे लागत आहे. एवढेच नाही तर विदर्भाच्याच वाट्याला लोडशेडिंग येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी अॅड. नंदा पराते, राम नेवले, किशोर पोतनवार यांनीही सत्ताधाऱ्यांचा चांगला समाचार घेतला व वेगळा विदर्भ म्हणणारेच विदर्भाची मागणी विसरल्याचे सांगितले. प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक मुसळे यांनी केले. संचालन आशिष मुसळे तर आभार शशिकांत बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (वार्ताहर)वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध आंदोलने करण्यात आली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सत्तेवर येताच वेगळा विदर्भ करु, असे लेखी आश्वासन देऊन मते लाटली. मात्र सत्ता हाती येताच राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परिवहन मंत्री आश्वासन विसरले आहे. त्यांना जाब विचारण्यासाठी येत्या ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथे ‘विदर्भ छोडो’ चा नारा देत मोठे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे विदर्भ आंदोलन समितीचे संयोजक अॅड. वामनराव चटप यांनी यावेळी सांगितले.
वेगळा विदर्भ हाच विदर्भाच्या विकासाचा पर्याय : खांदेवाले
By admin | Published: May 26, 2016 2:03 AM