चंद्रपूर - जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जहाल विषारी पट्टेरी मण्यार साप आढळून आला. चार फुट लांबीच्या या सापाला सर्पमित्रांनी पकडून मुक्त अधिवासात सोडून दिले. पट्टेरी मण्यार गडचिरोली जिल्ह्यात सापडल्याचा अनेक नोंदी आहेत. मात्र, चंद्रपूरात या सापाच्या नोंदी आढळत नाहीत. ब्रम्हपुरी हा तालुका गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे पुरात हा साप वाहात आल्याची शक्यता आहे. मण्यार हा जहाल विषारी साप असला तरी मानवाला दंश केल्याच्या नोंदी दोन्हीही जिल्ह्यात नसल्यातच जमा आहेत.
ब्रम्हपुरी शहरातील पेठ वॉर्ड येथील विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार साप आढळून आला. साप असल्याची माहिती सर्पमित्र गणेश सातरे, सार्थक मेहर यांना देण्यात आली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. त्यानंतर, या सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. मुक्त अधिवासात सोडल्यानंतर सापाने सळसळ करत पाण्यातून रानवाटात मार्ग काढल्याचं दिसून आलं. पट्टेरी मण्यार साप ब्रम्हपुरीत आढळल्याचा नोंदी फार कमी आहेत. भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, आसाम, बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात हा साप आढळून येतो. गडचिरोली जिल्ह्यात हा साप सापडल्याचा नोंदी आहेत.
चार प्रमुख विषारी सापात गणना
- मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात.- मण्यारचा दंश झाल्याचा नोंदी फार कमी- मण्यार सापाचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली व सरडे, इतर छोटे साप व बेडूक आहे.हा साप प्रामुख्याने जंगलात असतो.मात्र खाद्याचा शोधात जंगलालगत असलेल्या वस्तीकडे क्वचित प्रसंगी हा जात असतो.