मूल (चंद्रपूर) : एका कोब्रा सापाने दोन कोंबड्यांना दंश करून ठार केले आणि कोंबड्या उबवत असलेली टोपलीतील चक्क नऊ अंडी त्याने गिळंकृत केली. यानंतर साप तिथेच होता. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली असता साप अस्वस्थ दिसत होता. त्यांनी त्या सापाची शेपटी पकडून उलटे पकडले असता त्याने गिळंकृत केलेली नऊही अंडी होती त्याच अवस्थेत बाहेर काढली. मूल तालुक्यातील मरेगाव येथे बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात कुतुहल निर्माण झाले आहे. यानंतर त्या सापाला जंगलात सोडून जीवदान दिले.
मूल-नागपूर मार्गावरील मरेगाव येथील शामराव चुधरी यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर कोंबड्या आहेत. त्यापैकी दोन कोंबड्या अंडी उबवण्यासाठी बसलेल्या होत्या. ती अंडी खाण्यासाठी चक्क एक नाग साप तिथे आला. त्याने सर्वप्रथम त्या दोन्ही कोंबड्यांना दंश केला. यातच त्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. सकाळी शामराव चुधरी यांना दोन्ही कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. इतकेच नव्हे, तर त्यांना टोपलीतील कोंबडीची अंडीही गायब दिसली. त्यांनी चौकशी केली असता अंडी उबवण्यासाठी ठेवलेल्या टोपलीजवळच एक नाग साप आढळून आला. आणि त्याने अंडी गिळंकृत केल्याचे त्याच्या पोटाच्या वाढलेल्या आकारावरून दिसत होते.
मात्र ती अंडी त्यांच्या पोटात न फुटल्यामुळे तो अस्वस्थ झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच याची माहिती मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना देऊन बोलावून घेतले. त्यांच्यासोबत तन्मयसिंह झिरे हे देखील होते. त्यांनी सापाला पकडून बाहेर काढले. अंडी गिळंकृत केल्यामुळे त्याची वाढलेली अस्वस्थता लक्षात घेत त्या सापाची शेपटी पकडून त्याला उलटे केले असता एकापाठोपाठ एक अशी नऊही अंडी त्या सापाच्या पोटातून तोंडावाटे बाहेर आली. त्यातील एकही अंडी फुटलेली नव्हती. हा प्रकार बघण्यासाठी गावकºयांनी एकच गर्दी केली होती. यानंतर त्या सापाला जंगलात सुरक्षितस्थळी सोडून देण्यात आले.