चंद्रपूर - शेतात पाणी, घरात आणि वस्तीतही पाणीच पाणी. या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलं. जिथे माणस पुरापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. तिथे हा बळीराजा शेतातील खत सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माणूसभर पुरात उतरला आहे. या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झाली आहे. विदर्भात पावसामुळे अनेक नदी, नाले आणि ओढ्यांचे पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून एकाठिकाणी चक्क बैलगाडीच पाण्यात वाहून गेल्याची भीषण दुर्घटना घडली आहे.
नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नांदा येथील नाल्याला पूर आला असून गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरुन वाहत आहे. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. त्यामुळे, ग्रामस्थांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तर, गेली 15 वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. मात्र, यामार्गे असलेला बारमाही नाला विकासात अडसर ठरलाय.
शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैलगाडीत असलेल्या दोघांसह पुरातून वाट काढत असताना प्रचंड प्रवाहामुळे बैलांसह बैलगाडी वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले. मात्र, मोठी कसरत करुन पाण्यात उतरून गावकऱ्यांनी हे जीव वाचवले आहेत. गहिनीनाथ वराटे असे या दुर्घटनेत वाचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. एकीकडे देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे, मात्र साध्या-साध्या दळणवळणाच्या समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
वर्धा नदीलाही आला पूर
दरम्यान, तेलंगणा सीमेवरील वर्धा नदीलाही पूर आला असून या पुरातील पाण्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती पाण्याखाली गेली, पूर वाढतच आहे. त्यामुळं उर्वरीत शेती पाण्याखाली वाढण्याचा धोका वाढला आहे. शेतपिकांना खत टाकण्यासाठी खत पूर्वीच शेतात नेल्या गेलं होतं. अशावेळी नदीची पातळी वाढत असल्याने खत पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला होता. यातच डोग्यांने पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत वाचविण्यासाठी धडपड करीत आहे.