लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा शहर व ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७८ पर्यंत पोहचली आहे. त्यातील काही बरे होवून घरी गेले. जिल्हा स्तरावरील ताण कमी करण्याकरिता वरोरा शहरात कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. मात्र या सेंटरमध्ये सुविधाचा अभाव असल्याचा व्हिडीओ एका युवतीने सोशल मीडियावर वायरल केल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
एका युवतीच्या घरातील व्यक्ती कोरोना बाधित निघाल्यानंतर ही युवतीही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तिला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी असलेल्या खोल्यांमधील अस्वच्छता, शौचालय, बाथरुमची दुर्दशा आदीबाबतचा व्हिडीओ या युवतीने काढून सोशल मीडियावर वायरल केला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. आता सदर केंद्रात स्वच्छता करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, कोविड केअर सेंटरमधील सर्व खोल्यांची नियमित स्वच्छता केली जाते. त्याचे निजंर्तुकीकरण केले जाते. मात्र येणारे रुग्णच स्वच्छता पाळत नाही, असे येथील कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. उत्तम पाटील यांनी लोकमतला सांगितले.