प्रकाश दुबे : मंगल जीवने यांना पुस्कार प्रदानचंद्रपूर : बाळशास्त्री जांभेकर यांचे विचार, त्यांचे सिद्धांत आजही पत्रकारांसाठी मार्गदर्शक आहेत. पत्रकारांनी स्वत:ला ठाणेदार समजू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे पत्रकारांनी स्वत:ला मुख्य न्यायाधीश समजू नये. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपण किती मोठे आहोत, हे महत्त्वाचे नाही. तर माणुसकीच्या दृष्टीने आपण किती जागरूक आहोत, याचे चिंतन प्रत्येक पत्रकाराने करणे आवश्यक आहे, असे विचार वरिष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांनी चंद्रपूर येथे व्यक्त केले.दुबे चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष बंडू लडके, विभागीय चिटणीस हेमंत डोर्लीकर, परिषद प्रतिनिधी बबन बांगडे, माजी अध्यक्ष सत्यनारायण तिवारी आदी उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षपदी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास होते.नागभीड येथील ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ गरफडे यांना बाळशास्त्री जांभेकर, अभियंता ईश्वरकुमार आत्राम यांना लोकमान्य टिळक पुरस्कार, पर्यावरण कार्यकर्ते प्रा. सुरेश चोपणे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, लोकमत समाचारचे बल्लापूर येथील पत्रकार मंगल जीवने यांना स्व. चंपतराव लडके स्मृती सेवाव्रती पुरस्कार, छायाचित्रकार तेजराज भगत यांना स्व. रामवंती जयराजसिंह ठाकूर स्मृती पुरस्कार, पत्रकार सुनील तिवारी यांना स्व. लिलाताई बागडे स्मृती झेप गौरव पुरस्कार, रश्मी बोटकुले यांना स्व. समताताई नालमवार स्मृती जिल्हा विकास वार्ता पुरस्कार देण्यात आला. स्व. श्रीनिवास तिवारी स्मृती शोधवार्ता पुरस्कार प्रा. डॉ. धनराज खानोरकर, स्व. चांगुणाबाई मुनगंटीवार स्मृती पर्यावरण पत्रकारिता पुरस्कारासाठी उमेश वाळके, शांताराम पोटदुखेद्वारा प्रायोजित शैक्षणिक संस्था विकास वार्ता पुरस्कारासाठी प्रशांत देवतळे विजयी स्पर्धक ठरले. या सर्वांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.पत्रकार बंडू लडके यांचे ज्येष्ठ चिरंजीव क्षितीज लडके यांनी आय.पी.एल. क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय षटकार, चौकार मारून धावा केल्याबद्दल व पत्रकार भवनाचे चौकीदार विकास खेवले यांच्या कन्या संजिता खेवले यांची एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल तसेच अनिल बोरगमवार यांची ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदावर निवडी बद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मंचावर उपाध्यक्ष रामकृष्ण नखाते, डॉ. षडाकांत कवठे, वैभव पलीकुंडवार, यशवंत डोहणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरचिटणीस डॉ. उमाकांत धोटे यांनी सादर केले. संचालन मोरेश्वर राखुंडे यांनी व आभार प्रदर्शन दीपक देशपांडे यांनी केले. (प्रतिनिधी)
बाळशास्त्री जांभेकरांचे विचार आजही मार्गदर्शक
By admin | Published: January 07, 2017 12:45 AM