ब्रह्मपूरी (चंद्रपूर) : देशातील जनतेचे लक्ष विचलित करत धर्मांध, सत्तापिपासू विरोधकांकडून जातीपातीच्या राजकारणातून अराजकता पसरविण्याचे कार्य सुरू आहे. विरोधकांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी तसेच भविष्यकाळात आदिवासी समाजाच्या आरक्षणावर येऊ घातलेले गंडांतर रोखण्यासाठी आदिवासी समाजाने संघटित होऊन ठामपणे उभे राहावे, असे आवाहन बहुजन कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रह्मपुरी येथे आयोजित आदिवासी समाजप्रबोधन मेळावा व समाज सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. परिस्थिती विपरित झाल्याने सत्तापिपासूंनी धर्मांधतेची सोंगे पांघरून, कधी भोंगे तर कधी हनुमान चालीसा, अशा नव्या विवादित फंड्यांचा वापर करून वाढती महागाई, बेरोजगारी व अनेक ज्वलंत प्रश्नांना बाजूला सारून देशाला डबघाईच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी टीकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी बहुजनांच्या आरक्षणावर वार करून बहुजन समाजाला मूलभूत सोयी-सुविधांपासून दूर सारले. अगदी त्याचप्रमाणे भविष्यकाळात देशात समान नागरी कायद्याच्या रूपाने विविध समाजासह आदिवासी समाजाचेही आरक्षण गिळंकृत करण्याचे षङ्यंत्र रचण्यात येत असल्याची शक्यताही यावेळी वडेट्टीवार यांनी वर्तविली.