घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे.ब्रम्हपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकाला हे गाव असून घनदाट जंगलात वसले आहे. गावाची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे. परिसरातील गावांचे हे गाव मुख्यालय आहे. ये-जा करायला पक्के डांबरी रस्ते असले तरी संपर्काच्या दृष्टीने भ्रमणध्वनीची कोणतीही सेवा या ठिकाणी काम करीत नाही. आज सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपल्या सेवेच्या नेटवर्कचे जाळे सर्वत्र विनले आहे. मात्र या परिसरात सेवा देण्यास या कंपन्याही अपयशी ठरल्या आहेत. या गावातून इतर गावांसोबत मोबाईलद्वारे संपर्क करतो म्हटले तर घरावर चढावे लागते. एवढे करुनही संपर्क होईलच, याची शाश्वती नाही. येथील लोकांनी महागडे मोबाईल खरेदी केले आहेत. पण ते कुचकामी ठरले आहेत. या ठिकाणी एक शासनमान्य आश्रमशाळा आहे. साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. वन विभागाचे कार्यालय येथे असून विश्रामगृहही आहे. जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा या ठिकाणी कार्यरत आहे. एवढेच नाही तर परिसरात १० ते १२ गावांचा समावेशही आहे. एवढया जमेच्या बाजू असताना मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क उभारू नये, हे आश्चर्यच आहे.
६ वाजताच सर्वत्र शांततासंपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. त्यामुळे वाघ, बिबट व अन्य जंगली श्वापदांचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी लोक नेहमीच या प्राण्यांच्या दहशतीखाली वावरत असतात. संध्याकाळी ६ वाजताच या गावात सर्वत्र शांतता पसरली असते.
तर रेल्वे मार्ग होईल जवळ
हे गाव नागभीड तालुक्यातील बाळापूरला अगदी जवळ आहे. कागदोपत्री नोंद असलेल्या आणि जंगलातून गेलेल्या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर केले तर हे अंतर केवळ १० कि.मी. होईल, अशी माहिती तेथील एक कर्मचारी गणेश कडस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे हे गावच नाही तर परिसरातील काही गावेसुद्धा बाळापूर जाणाऱ्या रेल्वेशी जुळतील व जिल्ह्याच्या अगदी जवळ येतील.