लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा ज्वर आता सर्वप्रथम ग्रामीण भागात चढू लागला आहे. काही उमेदवारांच्या तिकीट निश्चित असल्याने त्यांचे कुटुंबीय, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावात नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचा कल जाणून घेत आहे. त्यांच्या समस्या समजून इच्छुक उमेदवारांकरवी त्या सोडविण्याचे आश्वासन देत आहे. काही कार्यकर्त्यांनी तर डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, चंद्रपूर, चिमूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी व राजुरा असे सहा विधानसभा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील ग्रामीण भागात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही उमेदवारांचे नाव निश्चित असल्याने त्यांनी आपले कार्यकर्ते कामाला लावले आहेत. इच्छुक उमेदवारांचे निकटवर्तीय, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता गावभेटीवर भर देत आहेत. गावागावात कार्नर सभा घेऊन गावकऱ्यांशी, महिलावर्गाशी संवाद साधताना दिसत आहे.यावेळी आवर्जुन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. त्या सोडविण्याचे आश्वासनही दिले जात आहे. आपला उमेदवार कसा चांगला, विद्यमान असेल तर त्यांनी केलेले विकासकामे याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला जात आहे.
सहाही विधानसभेसाठी ३९० नामांकन अर्ज गेलेविधानसभा निवडणुकीची प्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या दिवसापासून नामांकन अर्ज नेणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातून एकूण ८० नामांकन इच्छुक उमेदवारांनी नेले होते. आज सोमवारी सहाही विधानसभा क्षेत्रातून एकूण १११ व्यक्तींनी २५१ नामांकन अर्ज नेले आहेत. आता एकूण ३९० नामांकन अर्ज नेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. प्रत्येक राजकीय कार्यकर्ता निवडणुकीच्या कामात व्यस्थ झाला आहे. काही जणांच्या तिकीटा फायनल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मतदार संघात कामाला लागले आहेत. दुसरीकडे शासकीय अधिकारी व कर्मचारीदेखील याच कामात गुंतले आहे. २७ सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातून एकूण ८० नामांकन अर्ज गेले. यातून विधानसभा निवडणुकीबाबतचा उत्साह दिसून येतो. दरम्यान, आज सोमवारी सहाही विधानसभा क्षेत्रातून १११ व्यक्तींनी २५१ नामांकन अर्ज नेले आहेत. म्हणजे आतापर्यंत एकूण १८२ व्यक्तींनी ३९० नामांकन अर्ज नेले आहेत.
विधानसभा क्षेत्रनिहाय आकडेवारीराजुरा विधानसभा क्षेत्रातून आतापर्यंत २६ व्यक्तींनी ६० नामांकन अर्ज नेले आहेत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून २६ व्यक्तींनी ६४ नामांकन, बल्लारपूर क्षेत्रातून १६ व्यक्तींनी ४५ नामांकन, ब्रह्मपुरी क्षेत्रातून २८ व्यक्तींनी ८१ नामांकन अर्ज, चिमूर विधानसभा क्षेत्रातून ४५ व्यक्तींनी ५६ नामांकन अर्ज आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातून ४१ व्यक्तींनी ८४ नामांकन अर्ज नेले आहेत.
राजुरा क्षेत्रासाठी एक अर्ज दाखलराजुरा विधानसभा क्षेत्रातून एका उमेदवाराने आपला नामांकन अर्ज सोमवारी दाखल केला. सुरेश जयराम चरडे रा. गोंडपिपरी असे सदर उमेदवाराचे नाव असून त्यांनी अपक्ष म्हणून आपले नामांकन दाखल केले आहे. तब्बल दहा व्यक्ती त्यांचे सूचक आहेत.