स्वमर्जीने झाले एक लाख रुपये गोळा : ग्रामस्थ, जिल्हा परिषद शिक्षक आणि गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकारसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरमृत्यूशी झुंज देणाऱ्या आनंदच्या असह्य वेदनेमुळे ग्रामस्थ हेलावले. मुंबईतील एका रुग्णालयात जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरु झाला. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. कर्करोगावरील उपचारही महागडे. त्यामुळे उपचार कसा करावा, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला. ‘आनंद’च्या वेदनेने अस्वस्थ झालेलं गावं त्याच्या मदतीसाठी धावून गेले. पाहता पाहता एक लाखाचा निधी गोळा झाला अन् आनंदवरील पुढील उपचार सुरु झाला. गावाने दाखविलेल्या सहृदयतेने आता आनंदला नवजीवन मिळणार आहे.कोरपना तालुक्यातील भोयेगाव येथील मारोती ठेंगळे यांचा एकुलता एक २२ वर्षांचा आनंद चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयामध्ये बीसीए (द्वितीय) वर्षांला शिक्षण घेत आहे. तीन एकर शेतीमध्ये घराचा गाढा चालवून मारोती ठेंगळे शिक्षणाचा खर्च पूर्ण करीत आहे. सर्व सुरळीत सुरु असताना आनंदची प्रकृती ढासळली. त्याला मुंबई येथील टाटा मेमोरीयल हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी कर्करोग झाल्याचे निदान केले. मात्र मुंबईचा खर्च झेपणारा नसल्याने त्याला नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठी त्याला मोठा खर्च येत आहे. परिस्थिती नाजूक असतानाही मारोती ठेंगळे यांनी इकडून-तिकडून पैसा गोळा करून उपचार सुरु ठेवला. मात्र आता त्यांचेही हात टेकले आहे. ही बाब ग्रामस्थांना कळताच गावातील नागरिक, सरपंच, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन आर्थिक मदत करण्याचे ठरविले. फुल नाही तर फुलाची पाखळी म्हणून प्रत्येक नागरिकांनी मदत दिली. यातून १ लाख रुपये गोळा झाले. गोळा झालेली सर्व रक्कम कवठाळा येथील बँकेत जमा केली. मात्र ही रक्कमही आनंदच्या उपचारासाठी कमी जात असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी स्वत: परिसरातील भारोसा, एकोडी, पिपरी आदी गावात जावून मदतीची मागणी सुरु केली आहे. ग्रामस्थांची धडपड आजही कमी पडत आहे. त्यामुळे समाजातील दानशूर, स्वयंसेवी संस्था, राजकीय व सामाजिक संघटनांनी आनंदच्या कुटुंबीयांना मदत करणे गरजेचे आहे.
‘आनंद’च्या मदतीसाठी एकवटले गाव
By admin | Published: January 18, 2015 11:17 PM