बल्लारपूर : रस्ता सुरक्षा अभियान २०२१ च्या निमित्ताने बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या वतीने पाखडी हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणावर आयोजित कबड्डी स्पर्धेत खेड्यातील खेळाडूंनी शहरातील खेळाडूंना चीत करून विजयाची माळ खेचून आणली. शेवटच्या सामन्यात राजे क्रीडा मंडळ कळमना संघाने विजय मिळविला, तर श्रीराम बालक आखाडा संघ उपविजेता ठरला.
बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी विभागातील नऊ तर ग्रामीण भागातील आठ कबड्डी संघांनी भाग घेतला. शेवटच्या सामन्यात श्रीराम बालक आखाडा बल्लारपूर संघावर कळमनाच्या राजे क्रीडा मंडळाने दोन गड्यांनी विजय मिळविला. विजेत्या संघाला १० हजार रुपये रोख आणि शिल्ड तर उपविजेत्या संघाला ७ हजार रोख व शिल्ड आयोजक बल्लारपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, ॲड. राजेश सिंग, ॲड. मेघा भाले व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
कबड्डी स्पर्धेसाठी सहायक पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, विकास गायकवाड, मुलानी, प्रमोद रासकर,चांदोरे, वाहतूक शाखेचे नीलेश माळवे, शरद कुडे, गणेश परसूटकर, लोकेश नायडू, सतीश पाटील, रवी चुनारकर व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या स्पर्धेला शहरातील गणमान्य मंडळींनी सहकार्य दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आभार मानले.