चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येत असलेल्या पळसगाव येथील गावकऱ्यांनी रविवारी (25 नोव्हेंबर) पहाटे ताडोबाच्या मोहर्ली प्रवेशद्वाराचा मार्ग रोखून धरला. याचा पर्यटकांना फटका बसला आहे. मोहर्ली प्रवेशद्वारावर शंभर हून अधिक गावकरी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. गावकऱ्यांना ये-जा करण्यास, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी नेहमी त्रास देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
ताडोबा व्यवस्थापनाला धडा शिकवण्यासाठी गावकऱ्यांनी आज पहाटे चार वाजताच मोहर्ली गेटसमोर ठिय्या देऊन हा मार्ग बंद पाडला. यामुळे पर्यटकांची वाहने ताडोबाच्या आत सफरीला जाऊ शकली नाही. रविवार असल्याने ताडोबात मोठी गर्दी असते, पण सकाळच्या फेरीसाठी एकही जिप्सी ताडोबात प्रवेश करू शकली नाही. गावकऱ्यांच्या या आंदोलनामुळे ताडोबा व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे.