महसूल विभागाचा आंधळा कारभार : एकाच कुटुंबातील व्यक्तीला मिळाले वाटपातील पाच पट्टेपोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथील नागरिकांच्या वहिवाटीच्या व गुरेढोरे ठेवण्याच्या जागेवर बनावट कागदपत्राच्या आधारे बोगस पट्टे तयार करून अतिक्रमण करणाऱ्यांचे पट्टे तात्काळ रद्द करून स्थानिक नागरिकांच्या वहीवाटीची व गुरेढोरे ठेवण्याची जागा गावकऱ्यांच्या ताब्यात देण्यात यावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व संबंधित इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले.पोंभूर्णा तालुक्यातील देवाडाखूर्द येथील रामपूर दीक्षित सर्वे नं. ११/१ या शेतशिवारामध्ये एकाच कुटूंबातील व्यक्तीला शासनांतर्गत वाटपात देण्यात येणारा शेतजमिनीचा पट्टा त्याच कुटुंबामध्ये पाचव्यांदा देण्यात आला आहे. यामुळे महसुल विभागाचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. स्थानिक परिसरातील अनेक जबरानजोत कास्तकार गेल्या ४० वर्षापासून आपल्या वडिलोपार्जित अतिक्रमण असलेल्या शेतजमिनीवर उत्पादन घेऊन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अशा व्यक्तींना आजपर्यंत महसूल विभागाकडून अर्ध्या एकरचासुद्धा पट्टा मिळाला नाही. परंतु ज्यांचे वडीलोपार्जित अतिक्रमण किंवा वहिवाट नाही, अशा बोगस पट्टेधारकांना मात्र एकाच कुटूंबामध्ये १५ ते २० एकर वाटपांतर्गत पट्टे मिळाले असल्याची तक्रार देवाडा खुर्द येथील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. सदर बोगस पट्टेधारक सत्ताधारी पक्षाचे निकटवर्तीय असून पोंभूर्णा तालुक्यातील भाजपाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांचे यामध्ये वरदहस्त असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पोंभूर्णा तालुका कार्यालयामध्ये गेल्या पाच वर्षापासून अनेक गैरप्रकार झाल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. काही दलालामार्फत या ठिकाणच्या मुख्य रेकार्डची खोडतोड केली असल्याचे समजते. रामपूर दीक्षित येथील १०/१ दस्तऐवजाच्या पुस्तकातील पानेसुद्धा गायब करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याची चौकशी करणे आवश्यक झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)वास्तव्यास नसलेल्या व्यक्तीला मिळाला पट्टादेवाडाखुर्द येथे गेल्या सहा वर्षापासून बाहेर गावावरुन या ठिकाणी वास्तव्यास आलेल्या व्यक्तीचे कधीच वहीवाट व अतिक्रमण नसतांनासुद्धा गावकरी शंकरपट भरवित असलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीला २.०० हेक्टर शेतजमिनीचा पट्टा वाटपांतर्गत महसुल विभागामार्फत देण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकंदरीत हा संपूर्ण प्रकार राजकीय पुढाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याची खमंग चर्चा आहे.वेळवा येथील बोगस पट्ट्याचे लोनदेवाडाखुर्द येथे सुरूयापूर्वी पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चार हेक्टर जागेचा पट्टा मिळण्यासाठी महसूल विभागाकडे कागदपत्राची पूर्तता केली होती. सदर बाब स्थानिकांना मिळताच ग्रामस्थांनी याविषयी प्रचंड संघर्ष करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणाचे लोण आता देवाडा खुर्द येथे पसरू लागले आहे. राजकीय पक्षात काम करणारे कार्यकर्ते जनहिताचा विचार न करता स्वहिताकडे भर देवून आपला व आपल्या कुटूंबाचे हित कसे जोपासता येईल यात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे स्थानिक परिसरातील गरीब जनतेचे काय, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे. संबंधित प्रकरणाची दखल घेवून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाचा छडा लावून यामध्ये दोषी असलेल्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.
देवाडाखुर्द येथील बोगस पट्ट्यासंदर्भात गावकऱ्यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: January 31, 2016 12:57 AM