शंकरपूर : ग्रामपंचायत नेहमीच नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असते. तरुण सरपंच झाला तर गाव विकासासोबतच एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असतो. असाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम चिंचाळाशास्त्री या ग्रामपंचायतने प्रत्यक्षात उतरविला आहे. ग्रामपंचायतच्या रिकाम्या जागेत एक सुंदर परसबाग फुलविलेली आहे.
शंकरपूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचाळाशास्त्री हे जवळपास ५०० लोकसंख्येचे गाव आहे. तीन गावे मिळून ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे. या सात सदस्यीय ग्रामपंचायतीने परसबाग हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेला आहे. या ग्रामपंचायतीची एक इमारत असून जवळपास २ हजार फूट जागा ही रिकामी राहत होती. दरवर्षी इथे काडीकचरा उगवत होता. नव्यानेच सरपंच म्हणून निवडून आलेल्या अरविंद राऊत यांनी या जागेत परसबाग निर्माण करण्याचा संकल्प केला. सर्व सदस्यांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला. जागेची नांगरणी, वखरणी व शेणखत टाकून परसबागेची निर्मिती करण्यात आली. या परसबागेत कारले, चवळी शेंगा, भेंडी व इतर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. ही परसबाग चांगली फुलली आहे. चवळीच्या शेंगा व कारल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. हे उत्पादन गावकऱ्यांसाठी मोफत देण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना या भाजीपाल्याची गरज आहे त्या व्यक्ती ग्रामपंचायत चपराशाच्या समक्ष कारले व चवळी शेंग तोडून घेऊन जातात. सर्वांना याचा लाभ मिळावा, यासाठी एका कुटुंबाला अर्धा किलोच्या वर भाजीपाला नेऊ देण्यात येत नाही. यामुळे चिंचाळाशास्त्री येथील कुटुंबीयांना या परसबागेतील भाजीपाला मोफत मिळत आहे. ग्रामपंचायतीने राबविलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम तालुक्यातील पहिलाच असावा, असे बाेलले जात आहे.
कोट
रिकाम्या जागेचा चांगला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून या परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाला गरज आहे अशा कुटुंबाला या परसबागेतील अर्धा किलो भाजीपाला मोफत देत आहोत.
- अरविंद राऊत, सरपंच, चिंचाळाशास्त्री.