वरोरा (जि. चंद्रपूर) : देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आमसभेत घेतलेल्या निवडणुकीत उपस्थित २४० पैकी तब्बल २२५ जणांनी ठरावाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. आता काही गावकरी दुकानाला विरोध करीत असल्याने अवैध देशी दारू विक्रीला यामुळे आळा बसेल, असा तर्क सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसभा अध्यक्षांनी दिला आहे.
कार्यवाहीत गैरप्रकार झाला नसून, नियमाला धरून ग्रामसभा घेत ठराव घेण्यात आला आहे. काही ग्रामस्थांचा विरोध अनाकलनीय व गावातील अवैध देशी दारू विक्रीला प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. नागरी ग्रामपंचायतकडे सीएल-३ देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी लक्ष्मी अशोक शेट्टी (रा. भोईवाडा स्टेशन रोड, कल्याण, जि. ठाणे) यांनी रीतसर अर्ज केला होता. त्यावर २० डिसेंबर २०२२ रोजी ग्रामसभेची नोटीस काढली. २९ डिसेंबर २०२२ ला सकाळी ग्रामसभा झाली. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह २४० ग्रामस्थ उपस्थित होते.
केवळ १५ ग्रामस्थ आडव्या बाटलीकडेग्रामविकास अधिकाऱ्यांनी देशी दारू विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचा ठराव वाचून दाखवत उपस्थित ग्रामस्थांची मते मागितली. तेव्हा २४० पैकी २२५ उपस्थितांनी ठरावाच्या बाजूने कौल दिला. तर १५ ग्रामस्थांनी विरोध केला. यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दारू विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय २२५ विरुद्ध १५ मतांनी मंजूर झाला असल्याचे जाहीर केले.