भद्रावती : तालुक्यातील मौजा टाकळी, बेलोरा येथे अरबिंडो कंपनीने गावकऱ्यांची फसगत करून सर्वेक्षणाच्या मार्फत स्वाक्षरी केल्याचा प्रकार केल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अरबिंडो कंपनीला जमिनी देण्यास नकार दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
अरबिंडो कंपनीला कोल ब्लॉक मिळाल्याने ही कंपनी चालू करण्यासाठी त्यांच्या हालचाली चालू झाल्या आहे. टाकळी-बेलोरा येथील गट ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांना विश्वासात घेऊन त्यांच्या लेटरपॅडवरील परवानगीने अरबिंडो कंपनीने गावातील नागरिकांना कोणतीही माहिती न देता भूसंपादनाबाबत संपूर्ण अटी मान्य असल्याबाबतचे पत्र इंग्रजीमध्ये देऊन सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रकार चालू केला होता. हा फसवणुकीचा प्रकार हाणून पाडला. नंतर संपूर्ण गावकरी एकत्र आले असून या प्रकाराबाबत पोलीस स्टेशन भद्रावती येथे तक्रार दाखल करण्यात आली. अशा फसवणूक करणाऱ्या कंपनीला ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये तसेच गावातील कोणतीही जमीन देण्यास विरोध दर्शविला असून याबाबतचे निवेदन तहसीलदार नीलेश खटके यांना देण्यात आले. यावेळी आकाश वानखेडे, रितेश सातपुते, सतीश सातपुते, मनोज मत्ते, प्रवीण मत्ते, गणेश पंडिले, संजीवन जगताप, दादाजी देहारकर, सुभाष मत्तेसह शेकडो गावकरी उपस्थित होते.
220921\1451-img-20210922-wa0017.jpg
टाकळी बेलोरा येथील जमीन अरबिंडो कंपनीला देण्यास गावकऱ्यांचा विरोध.