भद्रावती : तालुक्यातील बेलोरा गावात गावकऱ्यांना तसेच ग्रामपंचायतीला कोणतीही सूचना न देता बुधवारी येथील खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले. हे सर्वेक्षण कशाचे, याबाबत भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी विचारले असता कर्मचाऱ्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत आले.
भद्रावतीपासून दहा ते बारा किमी अंतरावर असणाऱ्या बेलोरा गावाजवळ डागा माईन्सचा पट्टा अर्विंडो कोळसा खाणीला मिळाला आहे. या कंपनीच्या कोळसा उत्पादनाच्या हालचाली चालू झाल्याने परिसरात भूसंपादन तसेच इतर बाबींसाठी ग्रामपंचायतला अजूनपर्यंत कोणतीही सूचना केली नाही. तसेच ग्रामसभेतसुद्धा कोणताही याबाबत ठराव झाला नाही. मात्र या कंपनीचे कर्मचारी गावात फिरून प्रत्येक नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याचा प्रकार वानखेडे यांना आढळला. त्यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते कोणतेही उत्तर देत नसल्याचे बघून येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन कर्मचाऱ्यांना घेराव घेतला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यांनी केलेल्या या प्रकाराबाबत भद्रावती पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली.
कोट
या घटनेबाबत गावकऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला आणले, ते नेमके अर्विंडो कंपनीचे आहे की एम्टा खाणीचे आहे, याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. याबाबत गावकऱ्यांची गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे.
-गोपाल भारती, ठाणेदार भद्रावती.
150921\screenshot_20210915_153908.jpg
बिना परवानगीने बेलोरा गावात सर्वे करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांचा घेराव.