आयुध निर्माणी : शहरातील नागरिकांच्या घराघरात विद्युत पोहचविण्याचे काम ज्या महावितरण कंपनीकडे आहे. त्याच कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत सेवा देणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाही जीवंत तारापर्यंत वेली व झाडांच्या फांद्या पोहचल्या आहेत. त्यामुळे शहरातील जागोजागी उभे असलेले महावितरणचे विद्युत खांब अपघाताला कारण ठरू शकते. महावितरणने विद्युत खांबांवरील विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडे व वेली यांची छाटणी करून भावी अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.विद्युत ग्राहकांना सुनियोजीत व सुव्यवस्थीत वीज पुरवठा व्हावा, याकरिता महावितरण कंपनीतर्फे जागोजागी विजेचे खांब उभे केलेले आहे. पावसाळ्यात या खांबाभोवती कचरा व वेली तथा झाडे वाढतात. त्यांची मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाल्याने अनेकदा ती जिवंत विद्युत तारांपर्यंत वाढतात.अशा वेली व फांद्याची व्यवस्थित कटींग करणे व नागरिक तथा वीज ग्राहकांच्या जिवितांचे रक्षण करणे हे महावितरण विभागाचेच कर्तव्य आहे. कारण विद्युत प्रवाही तारांपर्यंत झाडांच्या फांद्या व वेली पोहचल्यावर त्यावरून विद्युत प्रवाह जमिनीपर्यंत पोहचू शकतो. अनेकदा अशा घटना घडल्याचे चर्चेत आहे.ज्या वीज खांबापर्यंत अशा वेली पोहचलेल्या आहेत, त्याची तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. महावितरण कंपनीने अशा विद्युत खांबासभोवतीचे व तारांना स्पर्श करणारी झाडे व वेली छाटावीत. शहरात अनेक ठिकाणी असे चित्र दिसत असले तरी महावितरण विभाग, ही बाब गंभीरतेने घेत नाही. कधी झाडांनी वेढलेल्या पोलवरून विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास नागरिकांना सेवा द्यायला कमीत कमी तीन-चार दिवस लागू शकतात. नागरिकांची होणारी गैरसोय व जिवीत हानी टाळण्याकरिता याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबत महावितरणचे शहर अभियंता बहादुरे यांना विचारले असता सध्या लेबरची समस्या असल्याने हे काम प्रलंबित असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
विद्युत पोलच्या तारांपर्यंत पोहोचल्या वेली व झाडांच्या फांद्या
By admin | Published: November 19, 2014 10:35 PM