कोरोना पार्श्वभूमीच्या टाळेबंदी काळात अनेकांचा रोजगार हिरावला. अशातच शेती हंगामापूर्वी येणाऱ्या तेंदूपत्ता संकलन हंगामाकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक मिळकतीसाठी लक्ष लागले होते. गोंडपिपरी तालुका हा वनसंपदेने नटलेला तालुका असून दरवर्षी येथील नागरिक तेंदूपत्ता संकलनाचे काम उत्साहाने करतात. यंदाचे वर्षी टाळेबंदी काळातही रानावनात जाऊन हल्लेखोर वन्यप्राण्यांच्या दहशतीत ही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू ठेवले. यात गोंडपिपरी युनिटमध्ये विहिरगाव, व्यंकटपूर ,चेक वेंकटपूर ,सुरगाव ,गणेश पिंपरी, चेकतळोधी ,सुखवाशी आदी गावांमध्ये नरसिम्हा बिडी लिव्हीज कंपनी तुकुम चंद्रपूर या कंपनीमार्फत तेंदूपत्ता पुडके संकलन फळी कार्यान्वित करून तेंदूपत्ता पुडके संकलन करण्याचे काम सुरू आहे. तर धाबा युनिटमध्ये धाबा, डोंगरगाव व अन्य गावांमध्ये तेंदूपत्ता फळी चार भाई बिडी कंपनीकडून सुरू करण्यात आलेली आहे. अगोदरच शासनाने कोरोना या संकटाला तोंड देण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावत टाळेबंदीची घोषणा केली. मात्र तेंदूपत्ता संकलन हंगामात कंत्राटदारांकडून शासन नियमावली पायदळी तुडविली जात आहे. संकलन फळीवर प्रचंड गर्दी जमविण्याचे काम तसेच संकलित केलेल्या तेंदूपत्ता पुडके यांच्या पलटविण्याच्या कामाकरिता अल्प मजुरी देऊन बाल कामगारांना कामावर घेत त्यांचे शोषण करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे. असे असतानाही याकडे वनविभागाचे लक्ष नाही. कोरोना काळात गर्दी जमवून या महामारीचा प्रसारास आमंत्रण देणाऱ्या तेंदूपत्ता संकलन कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
===Photopath===
260521\screenshot_2021_0525_120639.png
===Caption===
तेंदूपत्ता संकलन फळीवर पुडके पलटविण्याचे काम करताना बालकामगार