साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टीकबंदीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे आता महापालिकेने कडक कारवाई करणे सुरू केले आहे. दरम्यान, प्लास्टीक असल्याबाबत माहिती देणाऱ्याला महापालिकेने पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. येथील बागला चौक येथील हरीश मानकानी यांच्या मालकीच्या चांदणी फुड्स या दुकानावर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने बुधवारी सकाळी कारवाई करून दंड वसूल केला.
मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा गुन्हा केल्यास मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट केले. ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार, कर्मचारी अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम खोटे, सय्यद मोईनुद्दीन, डोमा विजयकर, अमरदीप साखरकर यांनी केली.
माहिती द्या, पाच हजार मिळवा
मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात आहे. प्लास्टीक पिशव्यांच्या साठ्याबाबत गुप्त माहिती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिक महापालिकेला प्लास्टीकच्या संदर्भात माहिती देत असून, मागील काही दिवसांमध्ये कारवाईचा धडाका वाढला आहे.