घुग्घुस : मागील अनेक दिवसांपासून घुग्घुस वणी रस्त्यावरून घुग्घुस बसस्थानकापर्यंत एकेरी वाहतूक असताना या रस्त्यावर नियमबाह्य ट्रकची वाहतूक होत आहे. अनेकदा अपघातही झाले असले तरी याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या येथील वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चंद्रपूर - घुग्घुस वणी मार्गावर बसस्थानक आहे. या बसस्थानकाचे नवीन बांधकाम गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये व ऊन, वारा, पावसापासून बचाव व्हावा यासाठी त्याच परिसरात शेड उभे केले आहे. सदर रस्त्यावर छत्रपती शिवाजी चौक ते राजीव रतन चौक पुढे वणीपर्यंत चौपदरी एकेरी रस्ता आहे. त्या दरम्यान पेट्रोल, डिझेल पंप आहे. लोडेड ट्रक थोडे अंतर व बसस्थानकासमोर असलेल्या द्विभाजकावरून वळण घेण्यास होत असल्याने ट्रकचालक राजीव रतन चौकापासून चुकीच्या दिशेने पेट्रोलपंपवर वाहने टाकून पोलिसांच्या डोळ्यांदेखत वाहतूक नियमांची पायमल्ली करीत आहेत. रस्त्यावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीबरोबरच अन्य वाहनांची वर्दळ असते. नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या दिशेने जड वाहतूक होत असल्याने एकेरी वाहतुकीचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वणीवरून घुग्घुस मार्गे चंद्रपूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस द्विभाजकामुळे बसस्थानकावर जाऊ शकत नाहीत. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.