चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयांच्या ओपीडींमध्ये व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये जीवघेण्या तापाचेसुद्ध रुग्ण असल्याने काळजी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येतात. मात्र, मागील वर्षी आलेल्या कोरोनाने दहशत पसरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच डेंग्यू, मलेरिया, मेंदुज्वर आदी प्राणघातक तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी ओपीडीतसुद्धा रुग्ण वाढले असल्याचे दिसून येते.
बॉक्स
ही घ्या काळजी
सद्य:स्थितीत व्हायरल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे संतुलित आहार घेणे, पाणी उकळून पिणे, तेलकट, तुपकट बाहेरचे खाणे टाळावे, बालकांचे मच्छरांपासून संरक्षण होईल, याची काळजी घ्यावी, थंड पाण्यात भिजू नये, तापाची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बॉक्स
कोरोना नाही डेंग्यूचे संकट वाढले
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी डेंग्यूचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढत चालल्याचे चित्र आहे. यामध्ये लहान बालकांचा समावेश आहे. यासोबतच टायफाॅइड, मलेरिया, मेंदुज्वराचे रुग्णही आढळून येत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.
कोट
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप आदी समस्या लहान मुलांना जाणवतच असतात; परंतु आता व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आहेत. कुटुंबीयांनी काळजी घेतली तरी प्रशासनाकडूनही या जीवघेण्या तापाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर