राजुरा : राजुरा तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्ये, सास्ती येथील रहिवासी स्वातंत्र्य संग्राम सैनिक विश्वनाथ पाटील काळे यांच्या पार्थिवावर सास्ती येथे शनिवारी दुपारी १२ वाजता शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. १९४२ मध्ये झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनात विश्वनाथ पाटील काळे यांचा सक्रीय सहभाग होता. १५ आॅगस्ट १९४७ च्या पहाटे रेडीओवर बातमी ऐकल्यानंतर राजुराच्या गांधी चौकात शंकरराव देशमुख यांनी निवडक साथिदारांना घेऊन तिरंगा फडकविला व ते भूमिगत झाले. या घटनेचे विश्वनाथ पाटील काळे साक्षिदार होते. त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात झालेल्या अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केला. ऐतिहासिक गढी परिसरातही झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या विश्वनाथ पाटील काळे यांना स्वातंत्र्यत्तोतर काळात अनेक पदके देऊन सन्मानित करण्यात आले होते. शासकीय इतमामात अंतीम संस्कार करण्यात आला. याप्रसंगी राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे, ठाणेदार प्रमोद डोंगरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
विश्वनाथ पाटील काळे अनंतात विलीन
By admin | Published: June 05, 2016 12:45 AM