चंद्रपूर : वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी कोलारा येथील निसर्ग पर्यटन संकुलाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कोलारा येथील हाऊस किपींगच्या कामावर घेण्याबाबतच्या मजुरांची सभा घेतली. सभेस रिसॉर्ट मॅनेजर व्ही.एन.शेलार, सहाय्यक व्यवस्थापक एस.बी.पाटील, विभागीय व्यवस्थापक एस.एस.डोळे तसेच किटाळी गावच्या सरपंच उपस्थित होत्या. या सभेत मजुरांनी हाऊस किपींगचे कामावर घेण्याबाबत वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनास आणून दिले. मजूरांना हाऊस किपींगचे प्रशिक्षण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत देण्यात आले आहे. त्यामुळे मजूरांना हाऊस किपींगचा रोजगार उपलब्ध करुन देणे, ही बाब ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत आहे. याबाबत वनगमंत्र्यांशी चर्चा करुन मजुरांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत कामे उपलब्ध करुन देणेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे चंदेल यांनी आश्वासन दिले.एफडीसीएम अंतर्गत कोलारा निसर्ग पर्यटन संकुलात प्रशिक्षित केलेल्या मजुरांपैकी फक्त ६ मजूर लावण्याची तरतुद आहे. त्यामुळे या संकुलात फक्त ६ प्रशिक्षीत मजूर सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे या मजुरांना कमी करुन दुसऱ्यांना कामावर लावणे शक्य होत नसल्याचे अध्यक्षांनी मजुरांना सांगितले. यावेळी अनेक मजुरांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
कोलारा निसर्ग पर्यटन संकुलाला चंदनसिंह चंदेल यांची भेट
By admin | Published: June 17, 2016 1:02 AM