लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चित्रसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन पाषाणावर रेखाटलेले बच्चन यांचेच व्यंगचित्र प्रसिद्ध चित्रकार प्रमोद रामटेके व प्रा. डॉ. इसादास भडके यांनी भेट दिले. हे पाषाणचित्र प्रमोदबाबूंनी रेखाटले आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी स्वत:च्या टिष्ट्वटरवर हे पाषणचित्र अपलोड केल्याने देशभरातील लाखो रसिकांनी प्रतिसाद दिला.नागपुरातील सेंट जॉन स्कूल येथे चित्रकार संजय मोरे यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भारतातील २० पेक्षा अधिक प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला होता. लोकनाथ यशवंत यांनी त्यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित ‘बाईस्कोप’ चित्रपटाविषयी बच्चन यांच्याशी संवाद साधला. चित्रप्रदर्शनात चंद्रपुरातील चित्रकार चंदू पाठक व सुदर्शन बारापात्रे यांनी रेखाटलेले अमिताभ बच्चन यांचे चित्र भेट म्हणून दिले. प्रा. डॉ. भडके यांनी चित्रकार रामटेके यांचे पाषाण चित्र व कवी लोकनाथ यशवंत यांच्या काव्याचा परिचय करून दिला. चित्रकला ही मानवी जीवनातील अत्यंत तरल व मनस्वी कला असून यातून समृद्धी अनुभवता येते. माझ्या आयुष्यावर रेखाटलेल्या व्यंगचित्रांची प्रदर्शनी पहिल्यांदाच आयोजित केल्याने ही घटना मनाच्या कप्प्यात कायम राहील, असे मनोगत बच्चन यांनी व्यक्त केले.
महानायकाला पाषाणचित्र भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:19 PM