वरोरा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय उपाययोजना कमी पडत आहे. वैद्यकीय योजना पुरवण्याकरिता समाजातील व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत लोकमान्य विद्यालय वरोरा २००५ चे माजी विद्यार्थी पुढे येत येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन यंत्र भेट दिले.
वरोरा येथील लोक शिक्षण संस्थेद्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयातील २००५ मध्ये शिक्षण घेतलेले मयूर ताजने, महेश कोरडे, भाविक पटेल, भूषण डांगरे, प्रदीप मांगुळकर, प्रफुल्ल आवारी, योगेश टिकट, पवन डोके, सचिन जीवतोडे, वैभव मोरे या विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाला कोरोना रुग्णांकरिता वरदान ठरणारी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते व उपजिल्हा रुग्णालय इन्चार्ज सिस्टर संगीता काकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी लोकमान्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच नगरसेवक राजू महाजन, प्रमोद मगरे, आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे, उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक गोविंद कुंभारे उपस्थित होते.