नागभीड : नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी येथील शीर्षस्थ अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींना भेटी देऊन, लसीकरण करून घेण्याचे आवाहन सुरू आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. नागभीड तालुक्यात आतापर्यंत बहुतांश लोकांनी लसीकरण करून घेतले आहे.
कोरोनास प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली असली तरी नागरिक याकडे दुर्लक्षच करीत आहेत. यास वेगवेगळ्या अफवाही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात तर विविध अफवांचे पेव फुटले आहे. मात्र नागरिकांनी अफवांना बळी न पडता लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. म्हणूनच येथील तहसीलदार मनोहर चव्हाण, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद मडावी हे संयुक्तपणे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना भेटी देत असून लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.
अधिकाऱ्यांचा हा चमू ग्रामपंचायतीत पोहोचल्यानंतर तेथील सरपंच, ग्रामपंचायतींचे सदस्य, ग्रामपंचायतींशी संबंधित कर्मचारी, तलाठी यांची बैठक घेऊन या सर्वांशी, नागरिकांना लसीकरणात कसे सहभागी करून घेता येईल यावर चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. त्याप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात. या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींना भेटी दिल्या आहेत. या भेटीनंतर अनेक गावांत लसीकरणाचे प्रमाण वाढले असल्याची माहिती तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
बॉक्स
रेशनवर भर
ग्रामपंतमध्ये बैठकीत होणाऱ्या चर्चेत लसीकरण मोहीम यशस्वी करावयाची असेल, तर जी व्यक्ती लसीकरण करणार नाही, त्याला रेशन मिळणार नाही, असा इशारा प्रशासनाने द्यावा, असे स्थानिकांकडून सुचविण्यात येते. काही ठिकाणी प्रशासनाकडून असा प्रयोग स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मदतीने करण्यात आला आणि या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळाला.
बॉक्स
असे झाले तालुक्यात लसीकरण...
तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख ३४ हजार ३२० असून लसीकरणाला पात्र लोकसंख्या ९८ हजार ३२२ आहे. यात १८ वर्षांवरील ५८ हजार ०२६, ४५ वर्षांवरील २६ हजार ८६३, तर ६० वर्षांवरील १३ हजार ४३३, अशी एकूण ९८ हजार ३२२ लोकसंख्या लसीकरणास पात्र आहे. यापैकी ३० हजार ६८९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.