घुग्घुस येथे आपची बैठक
घुग्घुस : आम आदमी पक्षाची बैठक गणेश उईके, अमित बोरकर यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथे नुकतीच पार पडली. या वेळी कार्यकारिणी गठित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, माजी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, संतोष दोरखंडे, भीवराज सोनी हे या वेळी उपस्थित होते.
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन
ब्रह्मपुरी : जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेद्वारे चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सर्व वाहन चालकांचा ३०६ रुपयांमध्ये ३० लाख रुपयांचा अपघाती विमा युनियन बँक येथे काढण्यात आला. या वेळी वाहन चालकांकडून भोजनदान देण्यात आले. या वेळी तालुका उपाध्यक्ष हिरालाल बटे, सचिव शेखर गिरी आदी उपस्थित होते.
बेलदार समाज संघटनेतर्फे कन्नमवार जयंती
वरोरा : बेलदार समाज संघटनेतर्फे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार जयंती कार्यक्रम सुभाष वाॅर्डातील महादेव मंदिरात पार पडला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी प्र. ग. तल्लारवार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. श्रीकांत अमशेट्टीवार, दिनकर पारेलवार, विद्या दागमवार, दीपा पारलेवार आदी उपस्थित होते.
मनपातर्फे शुक्रवारी सायकल मॅरेथॉन
चंद्रपूर : राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या ‘माझी वसुंधरा २०२१’ कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक ते जटपुरा गेट दरम्यान ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सभा
सास्ती : सत्र २०२०-२०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील माजी विद्यार्थी संघटनेची सभा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी प्राचार्य वरकड तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थासचिव अविनाश जाधव, प्राचार्य टी. सी. जोसेफ, संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, उपप्राचार्य डॉ. राजेश खैराणी आदी उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन द्या
चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांचे वाढीव मानधन ३१ जानेवारीपर्यंत अदा करण्यात यावे याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष राकेश नाकाडे, कार्याध्यक्ष प्रकाश मोहुर्ले, नामदेव येनुरकर, धनवार, कैलास वाळके, श्वेता अलीवार, रुपाली बजाईत आदी उपस्थित होते.
चंद्रपूर-वणी मार्गावर बंदोबस्त वाढवा
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असूनही घुग्घुस शहराजवळील विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलिसांकडून कारवाई केल्यानंतरही मद्यपी यवतमाळ व वणी येथे जात आहेत. पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फळे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर
चंद्रपूर : विविध प्रकारची फळे कृत्रिमरीत्या कॅल्शिअम कार्बाईडने पिकविली जातात. अशा फळांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दररोज आयात होत असल्याचे दिसून येत आहे.
जमनजेट्टी परिसरातील पथदिवे बंद
चंद्रपूर : शहरातील जमनजेट्टी परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने या मार्गावरील पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी तुळशीनगरात जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तोट्याअभावी पाण्याचा अपवय
चंद्रपूर : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. नगर परिषदेने नळधारकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिराची गरज
चंद्रपूर : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. पाच वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांसाठी शिबिराची गरज आहे.
रस्त्यावरील झुडपे ठरत आहेत जीवघेणी
सावली : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील व्याहाड, अंतरगाव, मुडझा रस्ता, निफंद्रा, डोंगरगाव, बोरखळा, कसरगाव, करोली, मंगरमेंढा रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढली आहेत.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
चंद्रपूर : येथील तहसील कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर अनिष्ट परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात. परंतु, कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कचरा टाकल्यास कारवाई करा
चंद्रपूर : विठ्ठल मंदिर वॉर्डात काही ठिकाणी मोकळ्या जागेवर कचरा टाकला जात आहे. कचराकुंड्या असतानाही हा प्रकार घडत आहे. मोकाट जनावरांमुळे कचरा नाल्यांमध्ये जाऊन तुडुंब भरत आहे. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. त्यामुळे मनपाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वॉर्डात पाठवावे व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
नवरगाव-सिंदेवाही रस्त्यावर खड्डे
सिंदेवाही : नवरगाव ते सिंदेवाही रस्ता अरुंद आहे. त्यातही रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अंधारी, उमा नदीला घाणीचा विळखा
मूल : अंधारी, उमा, शिरना, इरई, झरपट आदी नद्या बारमाही वाहतात. परंतु या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. काही पर्यटक नदीचे पाणी बघण्यासाठी येत असतात. पण नदीत घाण पसरल्यामुळे पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाले सांडपाण्याने भरले आहेत. सध्या प्रशासन व नागरिक निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे स्वच्छता मोहिमेकडे ग्रा. पं. प्रशासकांचे दुर्लक्ष होत आहे.
अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा
गडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झाले. या मार्गावरून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. गतिरोधक नसल्याने येथे अपघात घडत आहेत. या महामार्गावरील राजीव गांधी चौक, संविधान चौक व बाबूराव शेडमाके चौक येथे गतिरोधक नाही.
स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढवावा
पोंभुर्णा : गाव, शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही यश आलेले नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणारे अनेक जण आढळतात. त्यामुळे स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.