गडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेच्या १७ जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. बुथ कमी आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदार मतदानासाठी बुथवर दिसून आले. या निवडणुकीत ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.गडचांदूर नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी १०० उमेदवार मैदानात होते. यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल, असे भाकित वर्तविले जात आहे. अपेक्षेप्रमाणे मतदारांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, मनसे, शेतकरी संघटना, भारिब बहुजन संघ, बहुजन समाज पार्टीनेस्वतंत्र्य निवडणूक लढविली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत अपक्षांची संख्या मोठी आहे.रविवारी पार पडलेल्या निवडणुकीसाठी मतदारांनी सकाळ पासून बुथवर गर्दी केली होती. मात्र लोकसंख्या जास्त आणि बुथची संख्या कमी असल्याने अनेक बुथवर गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे, काही ठिकाणी उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सोमवारी नगर परिषदेमध्ये मतमोजणी होणार असून यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. निकालासाठी नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. (शहर प्रतिनिधी)
रात्री उशिरापर्यंत चालले मतदान
By admin | Published: January 18, 2015 11:19 PM