चंद्रपूर : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वि. दा. सावरकरांचे भिंतीशिल्प आहे. यामुळे नवीन पिढीला इतिहासाची माहिती होत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये कचरा वाढला असून सर्वत्र घाण साचली होती. यासंदर्भात हिंदूराष्ट्रम व स्वराज फाऊंडेशनच्या सदस्यांनी महापालिका तसेच काही नगरसेवकांकडे स्वच्छतेची मागणी लावून धरली. मात्र, याकडे त्यांनीही दुर्लक्ष केले. सततच्या पाठपुराव्यानंतर शुक्रवारी हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. इतिहासाची आठवण करून देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध आठवणींचे भिंतीशिल्प येथे साकारण्यात आले आहे. प्रशासकीय भवन, पोलीस मुख्यालय आदी परिसरात हा चौक आहे. मात्र, याकडे महापालिकेने अक्षरश: दुर्लक्ष केले होते. दरम्यान, हिंदूराष्ट्रम व स्वराज फाऊंडेशनचे देवानंद साखरकर, अश्विन मुसळे, राहुल अवताडे यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच झोन सभापती छबू वैरागडे यांच्याकडे परिसरातील स्वच्छतेची मागणी रेटून धरली. त्यानंतर वैरागडे यांनी दखल घेत शुक्रवारी या परिसराची स्वच्छता केली.
वि. दा. सावरकरांचे भिंतीशिल्प परिसर झाला स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:27 AM