सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाडेगाव येथून उत्तरेस असलेल्या वाढोणा - खरकाडा या जंगलव्याप्त मार्गाची दुर्दशा झाली असल्याने हा मार्ग सुरळीत करून या मार्गावर डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आलेवाही गट ग्रामपंचायतीने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
खरकाडा हे गाव वाढोण्यावरून उत्तरेस पाच किमी अंतरावर आहे. मात्र हे गाव आलेवाही गट ग्रामपंचायतीमध्ये येते. खरकाडा या गावाकडे जाणारा एकमेव मार्ग हा संपूर्ण जंगलाने वेढलेला आहे. आणि संपूर्ण गावच हे जंगलाच्या मधोमध आहे. या गावासभोवताल नेहमीच जंगली श्वापदांचा वहिवाट असतो. मात्र हा रस्ता कित्येक वर्षांपासून उखडलेला आणि कच्चा असल्याने येथील नागरिकांना या मार्गावरून प्रवास करणे हे तारेवरची कसरत आहे. वाढोणा येथील रमेश वाघाडे या गुराख्याला वाढोणा-खरकाडा मार्गालगत असलेल्या जंगलामध्ये नुकतेच वाघाने ठार केले होते. आणि बाजूच्या आकापूर येथील गुराखी खटू कुंमरे यालासुद्धा वाघाने ठार केले होते. या परिसरात वाघाच्या हल्ल्यात मनुष्यहानी होणाऱ्या या दोन्ही घटना प्रथमच घडल्या आहेत. त्यामुळे वाढोणा - खरकाडा या जंगल व्याप्त मार्गांवरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच जावे लागते. या मार्गांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या मार्गांवरून रेल्वे क्रासिंगसुद्धा गेली आहे. मात्र येथे बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यात वाघ सायंकाळच्या सुमारास बसून राहत असल्याचे येथील अनेक नागरिकांनी बघितले आहे.