लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगाव परिसरातील रत्नापूर बिटामध्ये खांडला गावाजवळ वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. या वाघिणीचा मृत्यू हा वाहनाची धडक बसल्याने झाला असावा, असा निष्कर्ष शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांच्या चमूने काढला आहे. रत्नापूर -खांडला या मुख्य रस्त्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाघीण मृतावस्थेत आढळली होती. दोन -तीन दिवसांपूर्वी वाघिणीघा मृत्यू झाल्याने दुर्गंधी सुटली होती. शवविच्छेदनामध्ये तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्या.आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय मोठया वाहनाची जोरदार धडक बसली असावी, तरीही ती काही अंतर पुढे जाऊन मृत पावली असावी आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या टिमकडून काढण्यात आला. सदर वाघिणीचे शवविच्छेदन डॉ.पि.आर. खोब्रागडे, डॉ. एस. एस. गव्हारे, डॉ. कुंदन पोडचलवार यांनी केले.
रेती तस्करीच्या वाहनाची बसली असावी धडकरत्नापूर-खांडला या रस्त्याने रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रकच्या सहाय्याने रेतीची वाहतूक होत असते. यातील एखाद्या वाहनाची धडक बसली की काय, या दृष्टीने वनविभागाने तपास सुरू केला आहे. रविवारी या संपूर्ण परिसराची वनाधिकाºयांनी पाहणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी अरूण गोंड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहाय्यक सुनील बुल्ले आणि त्यांची टिम पुढील तपास करीत आहेत.