लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने प्लास्टिकबंदी घातली आहे. आता महापालिकेनेही शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासोबतच स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या दृष्टीने कचरामुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. ३०) झालेल्या आमसभेत हे दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले. यासोबतच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.राज्यात प्लास्टिकमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर या निणर्याची चंद्रपुरात कडक अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. यावेळी शहरात व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याने व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मोहीम राबविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी पानठेलाचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहायक आयुक्त, झोन अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर चंद्रपूर प्लास्टिकमुक्तीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा आणि अमृतवरून सत्ताधारी नगरसेवकासह विरोधकांनीही काही वेळासाठी गोंधळ घातला. शहरातील काही भागात अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना आम्हाला करावा लागत असल्याचे नगरसेवकांनी आमसभेत सांगितले. अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली. अनेक पाईपलाइन फुटली. मात्र, अमृतच्या कंत्राटदारांकडून या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उज्ज्वल आणि अमृत योजनेच्या कंत्राटदाराला पुढील आमसभेत बोलाविण्याची मागणी करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सहभागी शहरांना आता केंद्र सरकार ‘स्टार’ मानांकन देणार आहे. सेवन स्टारपर्यंत हे स्टार दिले जातील. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीच चंद्रपूरला सर्वाधिक स्टार मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आयुक्त संजय काकडे यांनी व्यक्त केली. यावेळी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करण्यात आले. रामाळा तलावातील अशुद्ध पाण्याकडे लक्ष वेधले असता तलावात केवळ वेकोलिचेच पाणी येईल, अशी व्यवस्था करण्यासाठी आणि ते पाणी शुद्ध करून तलावात सोडण्यासाठी ३९ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती काकडे यांनी दिली.आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे उपस्थित होते.
शहर स्वच्छतेसाठी पुन्हा कसणार कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:09 PM
राज्य शासनाने प्लास्टिकबंदी घातली आहे. आता महापालिकेनेही शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासोबतच स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या दृष्टीने कचरामुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देआमसभेत विविध विषयांवर चर्चा : शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा ठराव मंजूर