चंद्रपूर : खरीप हंगाम सुरू झाला असून, पावसालाही सुरुवात झाली आहे. मात्र शेताकडे जाणारे तसेच पाणंद रस्त्यावर चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करीत शेतात जावे लागत आहे. विशेष म्हणजे, पाणंद रस्ते दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे.
दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शेताकडे जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात चिखलमय झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे. दुसरीकडे शेतीसाठी लागणारे साहित्य, खते, साहित्य बैलगाडीत घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सध्या शेतकरी पेरणीसाठी शेत तयार करीत आहेत. मात्र शेताकडे जाणारे अनेक मार्ग चिखलाने माखले आहेत. जिल्ह्यातील भद्रावती, कोरपना, राजुरा, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी यासह अन्य तालुक्यांतील शेती रस्त्यांची हीच अवस्था आहे. काही तालुक्यातील पाणंद रस्ते तसेच शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे; मात्र ते पूर्ण झाले नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
आता तर जेमतेम पावसाची सुरुवात झाली असून, पूर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे शेतात कसे जायचे, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.