घनश्याम नवघडे
नागभीड : पोटचा गोळा पाच दिवसांपासून घरी आला नाही. मारहाणीने अपमानित होऊन तो घरून निघून गेला. तो कसा असेल, काय करीत असेल या विवंचनेने त्या वृद्ध मातेची झोप उडाली आहे आणि म्हणूनच जीव डोळ्यांत ओतून ती वृद्ध आई आपल्या पोटच्या गोळ्यासाठी रस्त्याकडे नजर लावून आहे.
३१ ऑगस्ट रोजी जादूटोण्याच्या संशयावरून मिंडाळा येथील एका कुटुंबाने अशोक उपासराव कामठे यास भरचौकात पाण्याच्या टाकीस दोराने बांधून जबर मारहाण केली. त्याअगोदर या कुटुंबाने अशोकच्या वृद्ध आई व बहिणीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
या मारहाणीने अशोक चांगलाच अपमानित झाला. त्याच्या वृद्ध आईने मारहाणीनंतर जमावाच्या तावडीतून अशोकला सोडविल्यानंतर तो घरी आला आणि अतिशय भ्रमनिरास अवस्थेत आता मला या घरात व गावात राहायचे नाही, असे आई व बहिणीस सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी व गावातही दिसला नाही. या घटनेला आता पाच दिवस होत आहेत. मात्र अशोकचा अद्यापही ठावठिकाणा नाही. पोलीस आपल्या पातळीवर अशोकचा शोध घेत आहेत. पण पोलिसांनाही तो मिळाला नाही. आता मात्र त्याच्या वृद्ध आईचा धीर सुटत आहे. अशोकची आई अतिशय वृद्ध आहे. अशोकला बहीण असली तरी अशोक हाच तिचा आधार आहे.
040921\img_20210904_142010.jpg
अशोकची आई