बल्लारपूर : येथील रोजगार व मार्गदर्शन केंद्र मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ते कधी सुरु होणार याची प्रतीक्षा येथील बेरोजगार करीत आहेत.
येथील प्रशिक्षण केंद्र उपविभागीय कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आहे. प्रशस्त खोल्या व सभागृह तसेच आधुनिक बैठक व्यवस्थेने परिपूर्ण आहेत. सुमारे १५ लाख रुपये खर्चून खास याच कार्यालयासाठी वरचे मधले उभारण्यात आले आहे. डिसेंबर २०१८ पासून हे केंद्र सुरु झाले. सुशिक्षित तरुण, तरुणांच्या नावाची नोंदणी, त्यांना नोकरीबाबत मार्गदर्शन, त्यांचे मूल्य आकलन, क्षमतेत वाढ करणे, तत्त्वतः रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे आदी कामे या केंद्राकडून केली जाते. जिल्ह्यातील तालुका स्तरावर केंद्राकडून वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्याचा फायदा बेरोजगारांना मिळतो. कौशल्य विकास विभागामार्फत चालवले जाणारे केंद्र करोनामूळे मार्चपासून बंद पडले आहे. यामुळे केंद्राचे काम ठप्प पडले आहे. आता करोनासंदर्भात प्रशासनाने शिथिलता दिली आहे. मात्र बल्लारपूर येथील बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणारे हे केंद्र अजूनही बंदच आहे. त्यामुळे हे केंद्र सुरु करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.